कृषी क्षेत्रातील ‘अर्थपूर्ण’ अशा उद्योगांनंतर आपण कृषी क्षेत्राच्या पुढील टप्प्याकडे वळणार आहोत, तो म्हणजे अन्न प्रक्रिया उद्योग. अजूनही या उद्योगाचा भारतात पुरेसा प्रसार झालेला नाही. त्यामुळे या उद्योगामध्ये तरुणांना प्रचंड वाव आहे.
आपण मागील लेखांमध्ये फळ आणि शेती यांच्याविषयी माहिती घेतली. यात निर्मिती झालेल्या नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे खाद्य पदार्थ निर्माण करता येतात. या पदार्थाना प्रचंड मागणी असतेच तसंच मूळ फळ किंवा कृषी उत्पादनापेक्षा प्रक्रिया करून मूल्यवर्धन केलेल्या पदार्थाचे आíथक मूल्यही पुढील बाजार विक्रीमध्ये कैक पटीने वाढते. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगाकडे तरुणांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हा एक स्वतंत्र उद्योग होऊ शकतो. तसंच साधनांच्या उपलब्धतेनुसार याची व्याप्ती लघु किंवा मोठय़ा स्तरावर ठेवता येते. या उद्योगाकडे भारताने मागील दशकापासून विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.
अन्न प्रक्रिया उद्योग
अन्न प्रक्रिया म्हणजे अन्नपदार्थावर प्रक्रिया करून विविध पदार्थाची निर्मिती करणे. या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारचे पदार्थ निर्माण केले जातात. यामध्ये विविध प्रकारची पेये, चूर्ण आणि विविध प्रकारचे ठोस पदार्थ बनवता येतात. दुग्धव्यवसाय, प्रक्रिया केलेले पदार्थ, सॉफ्ट िड्रक्स. धान्यापासूनचे पदार्थ, मसाले, जाम, जेली, मीठ, पॅकेज फूड, इन्स्टंट फूड, लोणचे, मुरंबा, आंब्याचे विविध पदार्थ यांसारखे कितीतरी व्यवसाय सुरू करण्यासाठी आज संधी उपलब्ध आहे. त्याशिवाय यामध्ये फळे, भाज्या, चिकन, मटन, दूध, चॉकलेट्स, सोयाबिनचे पदार्थ, मिनरल वॉटर उद्योग अशा व इतर अनेक उद्योगांचा समावेश होतो. या इंडस्ट्रीसाठी लागणारा कच्चा माल भारतामध्ये मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचबरोबर मनुष्यबळ आणि आधुनिक यंत्रसामग्री या सा-या गोष्टी आपल्याला व्यवसायासाठी अनुकूल आहेत. आपल्याला निर्यातीसाठी पण खूप संधी आहेत.
अगदी लहान प्रमाणापासून सुरू करून कितीही मोठय़ा प्रमाणापर्यंत हा उद्योग वाढवता येतो. विविध प्रकारची उत्पादने एकत्र सुद्धा प्रक्रियेसाठी आपण निवडू शकतो. यासाठी उत्तम प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध आहे.
विविध प्रकारच्या अन्नप्रक्रिया उद्योगांची आपण माहिती घेऊ या.
मसाले
भारतीय मसाले प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. भारतीय मसाल्यांमध्ये जरी प्रसिद्ध ब्रॅण्ड असले तरीही इतर लहान-मोठय़ा अनेक मसाल्यांना उत्तम मागणी आहे. त्यामुळे मसाल्यांची विक्री आणि निर्यात हा एक उत्तम व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे हळदीचा व्यवसाय सुद्धा खूप चांगला पर्याय आहे.
फळ प्रक्रिया
फळ प्रक्रिया हा एक उत्तम व्यवसाय आहे. ज्यामध्ये कितीतरी प्रकारची उत्पादनांची निर्मिती करता येणं शक्य आहे. यामध्ये आंब्यापासून बनणारे आमरस, पाक, आंबेवडी तसेच सफरचंद, अननस, आंबा इ. फळांपासून बनणारी शीतपेये प्रसिद्ध आहेत. स्वत:चा ब्रॅण्ड बनवून या व्यवसायात उत्तम व्यवसाय निर्माण करता येईल.
दुग्ध प्रक्रिया
भारतासारख्या देशात जिथे एकीकडे दूभदुभत्याची मुबलकता आहे आणि दुसरीकडे काही ठिकाणी दुधाची वानवा आहे, अशा ठिकाणी दुधाची भुकटी तसेच सुगंधी दूध, विविध माध्यमातून प्रक्रिया केलेले दूध आणि असे इतर अनेक प्रकारचे व्यवसाय करता येतील. भारतातून अशा पदार्थाची खूप मोठय़ा प्रमाणात निर्यात होते.
शीतगृहे आणि गोदामे
प्रक्रियेबरोबरच उत्पादनांचे साठवणूक केंद्र हा सुद्धा उत्तम व्यवसाय आहे. फळे, भाज्या आणि मासे यांच्या साठवणुकीसाठी शीतगृहांची आवश्यकता आहे. तसेच ही उत्पादने वाहून नेण्यासाठी शीत वाहतूक व्यवस्था हा सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे.
अनुदान
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनेक प्रकारची अनुदाने आणि वित्त योजना उपलब्ध आहेत. यामध्ये मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या अनेक योजना आहेत. नाबार्ड या बँकेतर्फे अनेक प्रकारच्या कर्जाच्या योजना आहेत. सिडबी बँकेच्या अनेक योजना आहेत. फूड प्रोसेसिंग पार्क उभं करण्यासाठी अनेकविध योजना शासनातर्फे राबवल्या जातात. त्यामुळे या व्यवसायात येण्यासाठी उत्तम वित्त सहाय्य उपलब्ध आहे.
प्रशिक्षण
अन्न प्रक्रिया व्यवसायाचे प्रशिक्षण अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय फूड प्रोसेसिंग संस्थेतर्फे काही मोठे कोस्रेस राबवले जातात. यामध्ये बीएससी आणि एमएससी कोस्रेस उपलब्ध आहेत. असेच कोस्रेस मुंबई विद्यापीठातर्फे सुद्धा राबवले जातात. त्याचप्रमाणे दुग्ध प्रक्रिया आणि मत्स्य या विषयात अन्न प्रक्रियेसंबंधी विविध कोस्रेस उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ज्याला मोठा अभ्यास करायचा नाही; पण लहान कोस्रेस करून व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी अनेक लहान मुदतीचे कोस्रेस राबवले जातात.
खादी आणि ग्रामीण व्यवसाय या केंद्र शासनाच्या संस्थेतर्फे अनेक लहान कोस्रेस राबवले जातात. यामध्ये मसाले, बेकरी असे अनेक विविध कोस्रेस उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर एमएसएमई-डीआय असे अनेक कोस्रेस राबवते. मिटकॉन ही पुण्यातील संस्थाही असे अनेक कोस्रेस राबवते.
एकंदरीत अन्न प्रक्रिया हा एक अतिशय व्यापक आणि प्रचंड संधी उपलब्ध असणारा व्यवसाय आहे. यामध्ये लहान प्रमाणापासून ते अगदी कोटय़वधींची उलाढाल असणारा व्यवसाय निर्माण करणे शक्य आहे. यासाठी केवळ या व्यवसायाची उत्तम माहिती घेऊन उतरता येणं शक्य आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला नक्की कोणते उत्पादन घ्यायचे आहे, ते ठरवून त्यामध्ये उतरणे आवश्यक आहे. उत्तम प्रशिक्षण, शासनाची वित्त मदत आणि वाढीसाठी पुष्कळ वाव अशा प्रकारे सर्व बोटे तुपात असणा-या या व्यवसायाचा आपल्या तरुणांनी विचार करायलाच हवा.
नमस्कार
ReplyDeleteअतिशय चांगला प्रयत्न केला आहे
खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद