असा तयार करा प्रक्रिया उद्योगाचा अहवाल

उद्योग सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवालात प्रस्तावित उद्योगासंबंधी सविस्तर माहिती समाविष्ट करावी. सदर उद्योग आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम ठरणार आहे, तसेच घेतलेले कर्ज कशाप्रकारे परत केले जाईल याबाबत वित्तसंस्थेला खात्री पटवून द्यावी. व्यावसायिकाने प्रकल्प अहवाल जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बॅंकेकडे किंवा वित्तसंस्थेकडे कर्ज मंजुरीसाठी सादर करावयाचा असतो. 
दिनेश क्षीरसागर, डॉ. दिनेश नांद्रे 

प्रक्रिया उद्योग सुरू करण्याआधी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद करावी लागते, त्यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या सरकारी बॅंका किंवा सहकारी वित्तसंस्थांकडून कर्ज घेणे क्रमप्राप्त ठरते. लघु उद्योगांकरिता सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत. वित्तसंस्थेकडून कर्ज मिळविण्यासाठी त्यांना प्रस्तावित उद्योगांबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागतो. त्यास "प्रकल्प अहवाल' असे म्हणतात. 

अ) उद्योगाची ओळख - 
उद्योगाची निश्‍चिती करताना प्रथम बाजारपेठेचे सर्व्हेक्षण करणे अत्यंत जरुरीचे असते. प्रस्तावित उद्योगाद्वारे कोणते प्रक्रिया पदार्थ तयार करण्यात येणार आहेत यासंबंधी माहिती द्यावी. हे पदार्थ जगात तसेच देशात कोठे आणि किती प्रमाणात तयार होतात, त्यांचे उत्पादन किती होते, विनियोग कसा होतो, तसेच आपल्या परिसरात सदर उद्योग उभारणे कसे गरजेचे आणि फायदेशीर राहील याबाबत खुलासा करावा. जे पदार्थ तयार करायचे प्रस्तावित आहे, त्यांच्या प्रक्रिया तंत्रज्ञानाची माहिती थोडक्‍यात नमूद करावी. कोणत्या अन्नधान्यावर तसेच फळे व भाज्यांवर प्रक्रिया करणार, प्रत्येकापासून कोणते प्रक्रिया पदार्थ तयार केले जाणार, त्यांची प्रक्रिया पद्धती, प्रमाणीकरण, प्रतनियंत्रण आणि पॅकेजिंग यासारख्या बाबी स्पष्ट कराव्यात. याचबरोबर संबंधित प्रक्रिया उद्योगाबाबत शासकीय धोरण, प्रचलित फायदे, उपलब्ध सवलती यांचा उल्लेख करावा. प्रस्तावित उद्योगाचे पंजीकरण (Registration) केले असल्यास त्याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. उद्योग स्वतः एकटे किंवा खासगी कंपनी स्थापन करून करणार असल्यास उद्योजक म्हणून आपली स्वतःची किंवा कंपनीच्या मुख्य प्रवर्तक संचालकाची वैयक्तिक माहिती समाविष्ट करावी. उद्योग सहकारी आहे वा खासगी, हे स्पष्ट करावे. खासगी उद्योग असेल तर तो अधिक प्रभावीपणे कसा चालेल याबाबत सविस्तर माहिती, तसेच प्रस्तावित खासगी उद्योग यशस्वी होण्याची खात्री करून द्यावी. 

ब) उद्योगाचे ठिकाण व कार्यक्षेत्र - 
व्यवसायासाठी लागणारी जागा ही स्वतःच्या मालकीची असावी. जर दुसऱ्याच्या नावावर असेल, तर त्याबाबतचे संमतिपत्र प्रकल्प अहवालासोबत जोडावे. प्रस्तावित उद्योगाच्या ठिकाणाचा पत्ता नमूद करून सदर जागा मोठ्या शहरास रेल्वे, पक्के रस्ते यांनी कशी जोडलेली आहे हे नमूद करावे. उद्योगाची जागा मोठ्या शहरापासून शक्‍यतो जवळ आणि दळणवळणास सोयीची असावी. सदर ठिकाणाच्या सभोवतालच्या 75 ते 100 कि.मी. परिसरातील शेतीमाल (फळे, भाजीपाला व अन्नधान्य) प्रस्तावित प्रक्रिया उद्योगासाठी वापरला जाईल. काढणीनंतर हा माल कमीत कमी वेळ व खर्चात प्रक्रिया युनिटमध्ये पोचून त्यावर पुढील प्रक्रिया सुरू करणे कसे फायद्याचे आहे, याबाबत सविस्तर माहिती द्यावी. 

क) कच्च्या मालाची उपलब्धता -
प्रक्रिया युनिटच्या परिसराच्या हवामानाविषयी माहिती देऊन ते आवश्‍यक शेतीमालासाठी कसे उपयुक्त आहे याबाबत उल्लेख करावा. ज्या मालाची प्रक्रिया करावयाचे प्रस्तावित आहे; त्या प्रत्येक पिकाखालील परिसरातील लागवड क्षेत्र, जाती, एकूण उत्पादन, उत्पादक शेतकरी, त्यांचे सरासरी बाजारभाव, हमीभाव देऊन खरेदी होणार असेल तर नक्की केलेले बाजारभाव यांविषयी माहिती द्यावी. याशिवाय उद्योगासाठी लागणारी इतर संयंत्रे, संरक्षक रसायने, खाद्यरंग, पॅकिंग साहित्य, लेबल यांच्या उपलब्धतेविषयी उल्लेख करावा. 

ड) प्रक्रिया उद्योगाची किंमत व आर्थिक उपलब्धता : 
प्रामुख्याने प्रकल्पास लागणारी जमीन, प्रकल्पाचे बांधकाम, प्रक्रिया व साठवणुकीसाठी लागणारी संयंत्रे, इतर साधने उदा. विजेचे साहित्य, जनरेटर, पाणीप्रक्रिया युनिट, फर्निचर, प्रयोगशाळेकरिता लागणारी उपकरणे व साहित्य, पंजीकरण, उद्योगास लागणारे तज्ज्ञ मार्गदर्शन, तसेच प्रकल्प चालविण्यास लागणारा दैनंदिन किंवा मासिक कच्चा माल, मजूर यांच्या खर्चाचा तपशील द्यावा. यावरून प्रकल्पाची एकूण किंमत काढावी. एकूण लागणाऱ्या किमतीपैकी किती कर्ज बॅंकेकडून घेणार आणि किती स्वतः किंवा भागभांडवलातून उभारणार याचा तपशील द्यावा. त्याचप्रमाणे दैनंदिन किंवा मासिक खर्चासाठी कशाप्रकारे तरतूद केली आहे, हे स्पष्ट करावे. प्रकल्पासाठी द्यावयाच्या कर्जासाठी तारणाची काय व्यवस्था आहे याचा उल्लेख करावा. 

इ) आर्थिकदृष्ट्या उद्योग टिकण्याची व वाढण्याची शक्‍यता : 
यामध्ये उद्योग प्रत्यक्षात कधी सुरू होणार, उत्पादन क्षमता, युनिटच्या क्षमतेचा वापर, पक्‍क्‍या मालाच्या विक्रीची किंमत, एकूण विक्री, विक्रीसाठी येणारा खर्च, कच्च्या मालाची खरेदी किंमत, एकूण खरेदी, कर्जावरील व्याज, कर्जफेडीचा तपशील, वार्षिक नफा- तोटा पत्रक, अपेक्षित शिल्लक, मालाची विक्री करण्याची पद्धत आणि तपशील या बाबींचा समावेश करावा. 

ई) इतर बाबींचा तपशील : 
यामध्ये प्रकल्पासाठी लागणारी वीज, ती कोठून मिळणार, वीज उपलब्ध नसल्यास पर्यायी जनरेटरची व्यवस्था तसेच त्याचा खर्च, पाण्याची उपलब्धता आणि त्याचा खर्च, सांडपाण्याची व्यवस्था आणि त्याचा खर्च, लागणारे मजूर तसेच त्यांचे पगार यासारख्या बाबींचा समावेश करावा. 

निष्कर्ष - 
प्रस्तावित प्रक्रिया उद्योग कसा उपयोगी व आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे, त्याचे तांत्रिक तसेच आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे कसे केले आहे व तो निश्‍चितपणे कसा यशस्वी होण्याची शक्‍यता आहे याची ग्वाही द्यावी. 

कृषी प्रक्रिया उद्योगासंबंधी प्रकल्प अहवालातील महत्त्वाच्या गोष्टी - 
- प्रस्तावित उद्योगाची सर्वसाधारण ओळख 
- उद्योगाचे ठिकाण आणि कार्यक्षेत्र 
- कच्च्या मालाची उपलब्धता 
- प्रक्रिया उद्योगाची किंमत व आर्थिक उपलब्धता 
- आर्थिकदृष्ट्या उद्योग टिकण्याची तसेच वाढण्याची शक्‍यता 
- उद्योगासाठी लागणाऱ्या वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, मजूर यांचा तपशील. 

थोडक्‍यात पण महत्त्वाचे.. 
1) प्रकल्प अहवाल हा कृषी प्रक्रिया व्यवसायातील तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने तयार करावा. अशा तज्ज्ञ व्यक्तीस उत्पादन क्षमतेनुसार व्यवसायासाठी लागणारी इमारत, संसाधने, उत्पादन क्षमतेनुसार लागणारा कच्चा माल, उत्पादन क्षमता पूर्ण करण्यासाठी लागणारा कर्मचारी वर्ग, कुशल व अकुशल कामगार यांची परिपूर्ण माहिती असते, त्यामुळे प्रकल्प अहवाल तयार करताना चुका होणार नाहीत. 
2) प्रकल्प अहवाल तयार केल्यामुळे आपणास उद्योगाचे प्रस्तावित स्वरूप ध्यानात येते. आपला उद्योग यशस्वी होण्यासाठी योग्य खबरदारी घेणे सोपे जाते. 
3) व्यवसायासाठी इमारत अथवा शेड बांधताना हळूहळू उत्पादन क्षमता वाढल्यानंतर त्यामध्ये मशिनरींचा विस्तार करण्यास वाव असावा याची दक्षता घ्यावी. सुरवातीस कमीत कमी उत्पादनक्षमता गृहीत धरून हा व्यवसाय सुरू केल्यास नंतर हळूहळू विक्रीनुसार उत्पादन क्षमता वाढविता येते. 
4) प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर व्यावसायिकाने हा प्रकल्प अहवाल जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बॅंकेकडे किंवा वित्तसंस्थेकडे कर्जमंजुरीसाठी सादर करावयाचा असतो. 

संपर्क : 02189 - 233001 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

Comments

  1. सुंदर माहिती

    ReplyDelete
  2. सविस्तर आहे माहिती.

    ReplyDelete
  3. मला खडे मीठ पॅकिंग चा व्यवसाय करायचा आहे तर प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा

    ReplyDelete
  4. Sir mala What's app var thodi mahiti dili tar khup madat hoil 9613115757 Navnath Pandurang Kedari Kunjirwadi Pune 412201

    ReplyDelete
  5. भाजीपाला व्यवसायासाठी, अहवाल लेखन कसे करावे,,,8975655856,

    ReplyDelete
  6. खूपच छान माहिती दिली आहे,

    ReplyDelete

Post a Comment