अन्न प्रक्रिया उद्योग

                                      


                                               अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांपैकी अधिक प्राधान्य देता येईल  अशी अन्न ही मूलभूत गरज आहे. साहजिकच अन्न प्रक्रिया उद्योग हे क्षेत्र उत्पादन, खप, रोजगार आणि निर्यात या दृष्टीने मोठे क्षेत्र आहे. या व्यवसायामध्ये रूपांतर होवू शकतील अशी अनेक क्षेत्रे आहेत. जसे फळे अणि भाज्या प्रक्रिया, मासे प्रक्रिया, दूध व दुधाचे पदार्थ, मिठाई, मादक पेये, धान्य प्रक्रिया इ. क्षेत्रांमध्ये अनेक उद्योग संधी उपलब्ध आहेत. उद्योगातील इतर क्षेत्रांपेक्षा नफ्याचे प्रमाणही अन्नप्रक्रिया क्षेत्रामध्ये जास्त आहे. या क्षेत्रात उद्योगाची सुरूवात करता यावी यासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली आणि मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे अन्नप्रक्रिया उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन  करण्यात आले आहे. प्रशिक्षण 28 जुलै 2010 रोजी  सुरू होईल. 


                                           प्रशिक्षण 6 आठवडे कालावधीचे आहे. यामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रातील उपलब्ध असलेल्या संधीची ओळख करून देण्यात येईल. या प्रशिक्षणामध्ये उद्योजकता विकास संकल्पना, परिचय, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, बाजारपेठ पहाणी व माहितीचे संकलन, प्रकल्प आहवाल तयार करणे, नवीन व्यवसाय जसे जाम तयार करणे, मिठाई तयार करणे, वेफर्स तयार करणे, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे, भाजी पाला डिहाईड्रेशन, बेसन पीठ प्रकल्प, डाळमिल प्रकल्प,आवळ्याचे पदार्थ तयार करणे, मिरची पूड, हळद पूड, मसाले उद्योग, बेकरी, अशा अनेक प्रकारच्या व्यवसायांची माहिती या प्रशिक्षणात दिली जाणार आहे.


                                              नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध योजनांची माहिती, व्यवसायाचे व्यवस्थापन, पॅकेजिंग व गुणवत्तेचे नियोजन, मार्केटिंग व नियोजन यशस्वी उद्योजकांबरोबर चर्चा इ. या प्रशिक्षणात माहिती दिली जाईल. व्याख्याने, केस स्टडीज, प्रात्यक्षिके, प्रकल्पांना भेटी, या स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम असेल. यामध्ये सहभागी होण्यासाठी व्यक्ती सातारा जिल्ह्यातील रहीवासी असावी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असावे. शिक्षण 12 वी पास असावे या प्रशिक्षणासाठी फक्त 30 प्रशिक्षणार्थी निवडले जातील. प्रथम येणाऱ्यांना प्रधान्य दिले जाईल 24 जुलै ही प्रवेशाची अंतिम तारीख राहील अनुसुचित जाती व जमातीसाठी 20 टक्के  जागा राखीव असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रशिक्षणानंतर प्रकल्प यशस्वी सुरू होण्यासाठी मदत व मार्गदर्शन करण्यात येईल. प्रवेश मर्यादित असून प्रथम येणाऱ्यांस प्राधान्य देण्यात
येईल. 

                                               अधिक माहितीसाठी व नाव नोंदण्यासाठी महेश कुलकर्णी, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक, मिटकॉन  स्वयंरोजगार केंद्र, राजवाडा बस स्थानका जवळ, राजधानी टॉवर्स, तिसरा मजला, कामगार न्यायालयाच्यावर, सातारा संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Comments